सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांच्या पुढाकाराने विवेक विचार मंच व क्रिडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने “संविधान सन्मान रॅली” या विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिनाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये संविधान मूल्यांची जाणीव निर्माण करणे, तरुणांमध्ये देशभक्ती व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणे आणि पर्यावरणपूरक सायकल संस्कृतीचा प्रसार करणे हा आहे.
या रॅलीस मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता नॉर्थकोट प्रशाला, सोलापूर येथे भव्य उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध शैक्षणिक, क्रीडा व सरकारी संस्थांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग होता ,मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, सायकल रायडर्स, प्रशिक्षक, शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते.
या रॅलीत महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन, शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरीभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय,
कौशल्य रोजगार विभाग, दयानंद कॉलेज,
संगमेश्वर कॉलेज, एस. एच. ने प्रशाला यांचा सहभाग होता.
सोलापूरमध्ये संविधान दिन, पर्यावरण जागृती आणि फिटनेस या त्रिसूत्रीचा संगम घडविणाऱ्या या रॅलीतून संविधानातील प्रास्ताविकेतील मूल्ये स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता यांचे महत्त्व अधोरेखित केले . रॅलीदरम्यान सहभागींच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती घडविणारे फलक, संदेश, घोषवाक्ये यांचे दर्शन सोलापूरकरांना घडले.
आयोजक संस्थांच्या वतीने सोलापूरातील नागरिकांना, विशेषतः युवकांना, मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. समाजाची लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी संविधानिक जागृती हा अत्यंत आवश्यक घटक असून, या उपक्रमाद्वारे त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
यावेळी मनोज बिडकर, ज्ञानेश्वर म्याकल, दशरथ वडतिले, प्रशांत कांबळे, प्रीती उडाणशीव, अश्विनी चव्हाण, सिद्धांत बाबरे आदी उपस्थित होते.



















