सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सीआरटीडी संशोधन विभागाचे संचालक डॉ. एस. एच. पवार यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी नागरिक म्हणून आपली कर्तव्ये ओळखावीत, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती, त्यामागील ऐतिहासिक भूमिका व लोकशाही मूल्यांची सविस्तर माहिती दिली. तसेच 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहीद जवानांना अभिवादन केले.
कार्यक्रमात तांत्रिक सहाय्यक यशवंत बडेकर यांनी भारतीय संविधानाची विविध धार्मिक व वैचारिक ग्रंथांशी तुलना करत प्रत्येक नागरिकाने आयुष्यात एकदा तरी संपूर्ण संविधान वाचावे, असा मौल्यवान सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम काळात देशभक्ती आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारे वातावरण निर्माण झाले.



















