सोलापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा दौऱ्यावर होते. सकाळी त्यांचे लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख आदींनी त्यांचे स्वागत केले.
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर असून शहरातील सर्व २६ प्रभागात त्यांच्या भेटीगाठी, पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, विविध पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना सांगितले.
सर्वांनी एकत्रित मिळून, सर्वांना सोबत घेऊन व संघटित होऊन राष्ट्रवादीचे जोमाने काम करा,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितल्याचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. यावेळी माजी उपमहापौर विष्णू निकंबे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, चेतन गायकवाड, प्रदेश सरचिटणीस इरफान शेख आदी उपस्थित होते.



















