सोलापूर – वर्धा जिल्ह्यातील आरवी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या बॅनर खाली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी अधिकाऱ्यांनी आज गुरुवार ४ ते ६ डिसेंबर दरम्यान सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे. याप्रकरणी सोमवार ९ डिसेंबर पर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय नाही घेतल्यास महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी तीव्र आंदोलन करतील असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
पंचायत समितीसह जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्वच अधिकारी या रजा आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज आजपासून ठप्प होणार आहे.
या संदर्भात बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, विवेक जमदाडे, अमोल जाधव, शंकर कवितके, अमित कदम, उमेश कुलकर्णी, राजाराम भोग, मनोज राऊत, महेश सुळे, जस्मिन शेख आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीत मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहार प्रकरणात केवळ एका कंटाटी कर्मचाऱ्यांच्या साक्षीने गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्यावर गुन्ह्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत २ डिसेंबर रोजी रात्री उशिरा कोणतीही प्राथमिक, प्रशासकीय चौकशी न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता अटक करण्यात आली. महिला अधिकारी असल्याने आवश्यक असलेल्या कायदेशीर व प्रक्रियात्मक सावधगिरीची उपेक्षा झाल्याचा आरोप आंदोलनात सहभागी असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवेतील आंदोलक अधिकाऱ्यांनी केला आहे .

























