नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ ला आज (४ डिसेंबर) उत्साहपूर्ण सुरुवात झाली. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारांच्या सामन्यांना राज्यभरातील २४ विद्यापीठांच्या खेळाडूंचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. मैदानावर कौशल्य, वेग, रणनीती आणि जिद्दीची चमकदार मैफल रंगली.
कबड्डी स्पर्धेतील रोमांचकारी सामने: कबड्डी या क्रीडा प्रकारात आज एकापेक्षा एक चुरशीचे सामने खेळवण्यात आले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी अप्रतिम पकड, टाळ्या मिळविणारे चढाईचे डाव आणि तगडी बचावशैली सादर केली.
कबड्डी (मुली) या क्रीडा प्रकारात मुंबई विद्यापीठ, गडचिरोली विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई, कोल्हापूर विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ तर कबड्डी (मुले) या क्रीडा प्रकारात पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, डॉ. होमी भाभा विद्यापीठ, मुंबई, जळगाव विद्यापीठाच्या संघानी विजय मिळवत प्रभावी कामगिरी नोंदवली.
खो-खो स्पर्धेत नांदेड विद्यापीठाचा थरारक विजय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवांतर्गत खो-खो स्पर्धेतील मुले व मुलींचे सामने अतिशय रोमांचक झाले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंच्या चपळाई, वेग आणि हुशार रणनीतीची विलक्षण जुगलबंदी पाहायला मिळाली.खो-खो (मुले) या स्पर्धेच्या चुरशीच्या सामन्यांत विजयी संघांची चमक पहावयास मिळाली. यामध्ये यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठाच्या संघांनी तर खो-खो (मुली) या स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, महिला विद्यापीठ, मुंबई, पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठाच्या संघांनी विजय मिळविला.
बास्केटबॉल स्पर्धेत दोन्ही संघात विजयाची चुरस
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील बास्केटबॉल स्पर्धेला आज उत्साहपूर्ण सुरुवात झाली. मैदानावर उतरताच खेळाडूंनी अचूक पासिंग, वेगवान ड्रिब्लिंग आणि प्रभावी शूटिंगची चमकदार मेजवानी साकारली. राज्यातील विविध विद्यापीठांतील खेळाडू संघांनी विजयाची जिद्द आणि संघभावनेचे उत्तम प्रदर्शन करत स्पर्धेची रंगत उंचावली. पहिल्याच दिवसापासून सामन्यांमध्ये चुरस वाढल्याने प्रेक्षकांचा उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट सतत दुमदुमत राहिला.
बास्केटबॉल (मुली) स्पर्धेत अमरावती विद्यापीठ, लोणेरे विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठाच्या संघांनी तर बास्केटबॉल (मुले) स्पर्धेत कोल्हापूर विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, होमी भाभा विद्यापीठ, मुंबई आणि नागपूर विद्यापीठाच्या संघांनी विजय मिळवत प्रभावी कामगिरी केली.
व्हॉलीबॉल स्पर्धेला जोरदार सुरुवात
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेला आज उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान सुरुवात झाली. कोर्टावर खेळाडूंच्या दमदार सर्व्हिस, अचूक सेटिंग आणि विजेच्या वेगाने होणाऱ्या स्मॅशेसमुळे सामन्यांना सुरुवातीपासूनच तापलेले वातावरण लाभले. विविध विद्यापीठांतील संघांनी संघभावना, रणनीती आणि कौशल्याचा अप्रतिम संगम साधत रोमांचक खेळीची मेजवानी सादर केली. प्रेक्षकांच्या टाळ्या, आरोळ्या आणि उत्साहामुळे पहिलाच दिवस व्हॉलीबॉलच्या थराराने दुमदुमला.
व्हॉलीबॉल (मुली) स्पर्धेत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, पुणे विद्यापीठ, महिला विद्यापीठ, मुंबई, राहुरी विद्यापीठ तर व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेत लोणेरे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या संघाने विजय मिळविला.
टेबल टेनिस स्पर्धेची सुरुवात –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेला आज उत्साहपूर्ण सुरुवात झाली. टेबलावर चेंडूची वीजवेगाने होत असलेली देवाणघेवाण, खेळाडूंचे अचूक स्मॅशेस, नियंत्रित स्पिन आणि तांत्रिक कौशल्य पाहून मैदानात थरार निर्माण झाला. राज्यभरातील विद्यापीठांमधून आलेल्या खेळाडूंनी पहिल्याच फेरीपासून प्रभावी कामगिरी करत स्पर्धेची रंगत उंचावली. प्रत्येक पॉईंटसाठीची धडपड आणि उत्कृष्ट रॅलींनी प्रेक्षकांचा उत्साह दुणावला.
टेबल टेनिस (मुले) स्पर्धेत राहुरी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाने विजय मिळविला.
बॅडमिंटन स्पर्धेला दमदार सुरुवात –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील बॅडमिंटन स्पर्धेला आज जलद आणि उत्साहपूर्ण सुरुवात झाली. कोर्टावर शटलकॉर्कचे वेगवान उड्डाण, खेळाडूंचे फटकेबाज स्मॅशेस, अचूक ड्रॉपशॉट्स आणि चपळ प्रतिक्रिया पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. राज्यातील विविध विद्यापीठांतील खेळाडूंनी पहिल्याच फेरीपासून स्पर्धात्मक खेळाची उज्ज्वल झलक दाखवत स्पर्धेची रंगत अधिकच वाढवली. प्रत्येक रॅलीतून कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीची मैफलच रंगली.
बॅडमिंटन (मुली) स्पर्धेत नांदेड विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, महिला विद्यापीठ, मुंबई आणि बॅडमिंटन (मुले) स्पर्धेत नांदेड विद्यापीठ, एच.एस.एम.सी. विद्यापीठ, मुंबई, मुंबई विद्यापीठने विजय मिळविला.
क्रीडा महोत्सवाचा पहिला दिवस राज्यातील तरुण खेळाडूंच्या क्रीडाप्रेम, जिद्द आणि हार न मानणाऱ्या वृत्तीने उजळून निघाला. पुढील काही दिवसांतही अनेक रोमांचक सामने रंगणार असून क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

























