सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक वाढत आहे. शनिवारी बाजार समितीत सुमारे ३५० डाग गुळाची आवक झाली. लिलावात प्रति १० किलोच्या गुळाच्या ढेपेला ४,००० ते ४,५०० रुपये पर्यंतचा घाऊक दर मिळाला. आगामी मकर संक्रांत आणि सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुळाची आवक आणखीन वाढेल, तसेच मागणी वाढून देखील दर वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सोलापूर बाजार समितीत धाराशिव, लातूर तसेच बीड या मराठवाड्यातून गुळाची आवक होत आहे. तर सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये गुळाची विक्री होत आहे. गुराळची संख्या कमी प्रमाणात झाल्याने गुळ बनवण्याची प्रक्रिया मंदावली आहे. गतवर्षी याच महिन्यात पाच हजाराहून अधिक गुळाचे डाग विक्रीसाठी बाजार समिती दाखल झाले होते. परंतु यंदाच्या वर्षी आवक घटली आहे. येत्या आठवड्याभरात आवक आणखीन वाढेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
गुराळ बनवण्यासाठी कामगारांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु कामगारांचा तुडवडा असल्याने शेतकरी गुळ बनवण्याकडे प्राधान्य क्रमाने लक्ष देत नसल्याचे जाणवत आहे. यामुळेच सोलापूर जिल्ह्यात एकही गुराळ चालवला जात नाही. सर्व गुळ हा मराठवाड्यातून मागवला जातो. विशेषतः धाराशिव बीड आणि पुणे जिल्ह्यातील खेडेगावात गुराळ चालवले जातात. गुळ बनवण्याची प्रक्रिया लेंदी आणि खर्चिक असल्याने, त्याचा मोबदला मिळावा तितक्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेतकरी याकडे विशेष लक्ष देत नसल्याचेही यावेळी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गुळाची आवक वाढली
सोलापूर बाजार समितीत गुळाची आवक वाढत आहे. आगामी गड्डा यात्रा आणि मकर संक्रांती लक्षात घेता तिळगुळ तसेच शेंगाच्या पोळीसाठी गुळाची मागणी असते. त्यामुळे सध्या गुळाची मागणी वाढत आहे. सोलापूर बाजार समितीत गुळाला लिलावात कमीत कमी ३,५०० ते जास्तीत जास्त ४,५०० तर सर्वसाधारण ४,००० असा घाऊक दर मिळत आहे.
– संगमेश्वर बिराजदार, गुळ व्यापारी बाजार समिती सोलापूर.
गुळाचे दर भविष्यात आणखीन वाढण्याची शक्यता
सण उत्सव यात्रा कालावधीत विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी गुळाची आवश्यकता असते. अशातच मकर संक्रांतीला तिळगुळ आवश्यक असतो. त्यामुळे गुळापासून चिक्की, तिळगुळ आणि रेवड्या बनवल्या जातात. त्यासाठी घाऊक किरकोळ तसेच घरगुती गुळाची मागणी वाढवून दर वाढण्याची शक्यता आहे.
– आनंद दुलंगे, गुळ व्यापारी बाजार समिती सोलापूर.
फोटो ओळ – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुळ गोदामात गुळांच्या ढेपेची आवक वाढली असून व्यापारी गुळाचे लिलाव काढताना टिपलेले हे छायाचित्र


















