सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर व मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात दि. 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय मनोरमा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांची आज एकमताने निवड करण्यात आली.
कोटणीस नगर येथील मनोरमा कॉन्फरन्स सभागृहात डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सभेत एकमताने ही निवड करण्यात आली. यावेळी मनोरमा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. राजशेखर शिंदे, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, मनोरमा साहित्य मंडळीच्या महिला उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड, निवड समितीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. कविता मुरूमकर, मसापचे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, कवी मारुती कटकधोंड, गझलकार बदिउज्जमा बिराजदार, राजेंद्र भोसले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, न्यूज प्लसचे तात्यासाहेब पवार, उमाकांत चौंडे, विजय कालेकर, सोलापूर आकाशवाणीचे निवृत्त निवेदक अभिराम सराफ, कोषाध्यक्ष शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी, नीलकंठ करंडे, पुरुषोत्तम साखरे, सुनील पाटील, संध्या हेब्बाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदासाठी मोरे यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांनी मांडली तर गोविंद काळे यांनी त्यांना अनुमोदन दिले. याप्रसंगी राजेंद्र भोसले, कविता मुरुमकर, अभिराम सराफ, तात्यासाहेब पवार, किरण बनसोडे आदी मान्यवरांची अभिनंदन आणि शुभेच्छापर भाषणे झाले.
संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे म्हणाले, “मराठी भाषेची जननी संस्कृत आहे. तिचा प्रचंड मोठा विस्तार झाला असून ती भाषा आपण जपली पाहिजे. मराठी भाषेला नैतिकतेचे अधिष्ठान आहे. आजपर्यंत गेल्या 26 वर्षात मनोरमा परिवाराने साहित्य क्षेत्रातील 250 जणांना सन्मानित केले आहे. ही चळवळ पुढेही चालूच राहील. मराठी साहित्य आज कुठे आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भावार्थदीपिका आली आहे. संत साहित्याचा गाभा यामध्ये आपणास सापडतो. मराठी भाषेचे संवर्धन आणि जागर झाला पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने संमेलन यशस्वीरित्या पार पाडू ,अशी ग्वाही देतो.”
यावेळी शोभा मोरे, अस्मिता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी सभेचे अध्यक्ष राजा माने यांचा सत्कार श्रीकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्रीकांत मोरे यांचा सत्कार राजा माने यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. राजशेखर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पद्माकर कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही मोरे यांची निवड व्हावी : माने
यावेळी राजा माने म्हणाले, श्रीकांत मोरे यांची अखंड साहित्य सेवा चालू आहे. गेल्या 26 वर्षाची ही चळवळ असून यामध्ये मोरे यांचे अमूल्य योगदान आहे. त्याचे साहित्य मुक्तछंदामध्ये आहे. कथा, कविता, ललित लेखन या सर्व प्रकारात त्यांचे नैपुण्य आणि गुणवत्ता आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवणारा हा माणूस बँकेचे कामकाज सांभाळून मराठी साहित्य क्षेत्रात सेवा करत आहे. त्यामध्ये त्यांनी कुठेही खंड पडू दिला नाही. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी अशी योग्यता त्यांच्याजवळ आहे, अशी भावना राजा माने यांनी व्यक्त केली.
सर्वांच्या सहकार्यातून सुसूत्र पद्धतीने संमेलन यशस्वी होईल : श्रीकांत मोरे
सोलापूर हे तीर्थक्षेत्र आहे. त्याला ऐतिहासिक, भौगौलिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान मोठे आहे. सोलापूरला साहित्य क्षेत्रात मोठा वारसा लाभला आहे. डिजिटल युगातही अनेक लोक पुस्तके वाचतात. मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे या मुख्य उद्देशातून सोलापुरात होणारे हे संमेलन सर्वांना घेऊन यशस्वी करूया.
नेटके नियोजन आणि सुसूत्र पद्धतीने हे संमेलन होईल, असा विश्वास नूतन अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.


















