मोडनिंब – माढा तालुक्यातील मोडनिंब एमआयडीसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांनी दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधताना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की,मोडनिंब एमआयडीसीचा अखेर मार्ग मोकळा झाला असून महसूल मंत्र्याकडून मंजुरी मिळाली आहे.याबाबत मोडनिंब (ता. माढा) येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत प्रकल्पाच्या इको-सेंसिटिव्ह झोनशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी विधान भवन नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महसूल विभागाचे अप्पर सचिव मोहसिन शेख, उपसचिव अजित देशमुख, वनविभागाचे डीएफओ, एमआयडीसी विभागाचे आर.ओ, महसूल मंत्री विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गांगुर्डे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले.बैठकीदरम्यान एमआयडीसी साठी इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मान्य उद्योग उभारणीला शेतकऱ्यांनी पूर्वीच संमती दर्शविल्याची माहिती सादर करण्यात आली. शेतकऱ्यांनी दिलेली लेखी संमती पत्रेही शासनास सुपूर्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर रणजीत शिंदे यांनी मुद्देसूद मांडणी करत मोडनिंब एमआयडीसीची आवश्यकता व स्थानिकांची तयारी याबाबत सविस्तर विश्लेषण केले.
या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रकल्पास पूरक अशी ठाम अग्रही भूमिका घेत मोडनिंब एमआयडीसी ला मंजुरी मिळावी यासाठी स्पष्ट बाजू मांडली. उपस्थित सर्व मुद्द्यांचे परीक्षण करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोडनिंब एमआयडीसी प्रकल्पास मंजुरी दिल्याचे घोषित केले.मोडनिंब एमआयडीसी संदर्भातील ही मंजुरी स्थानिक विकासासाठी मोठे पाऊल मानली जात आहे.


























