पंढरपूर – तुमच्या शेता मध्ये जी ऊसाची कांडी आहे ती सोन्याची कांडी आहे. तिला भंगाराच्या किंमती मध्ये विकु नका. कोणत्याही परिस्थितीत कारखानदारांच्या दबावाला बळी पडू नका असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजु शेट्टी यांनी केले.
वाखरी पालखी तळावर उसदरवाढी सर्व शेतकरी संघटना एकत्रितपणे येवुन आंदोलन करीत आहेत. त्या ठिकाणी समाधान फाटे आणि इतर तीन ते चार जणांनी बेमुदत उपोषण सुरु केलेले आहे. त्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी शनिवारी (ता.१३) राजु शेट्टी आलेले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, दीपक भोसले, सचिन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मागील पाच ते सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले समाधान फाटे, गणेश लामकाने, बाळासाहेब जगदाळे राहुल पवार यांनी राजु शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी उपोषण मागे घेतले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजु शेट्टी म्हणाले, आपल्या हक्काची लढाई आपणालाच लढावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होवून पुढे आले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कारखान्याकडे गाळपास ऊस पाठविताना तो खासगी काट्यावर वजन करुन आवश्य पाहिला पाहिजे असे देखील त्यांनी शेतकऱ्यांना ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रा मध्ये आज अशी एक सामाजिक स्थिती निर्माण झाली आहे की इथल्या सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत. कुठतरी थोडीफार धग राहिली आहे ती शेतकरी चळवळ मध्येच आहे. त्यामुळे आपण देखील चळवळीतील कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले पाहिजे असे सांगून त्यांनी उपोषणकर्त्यांना तब्बेत खालावत असल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी मनसेचे दिलीप धोत्रे, रविकांत तुपकर तसेच उपोषणकर्ते समाधान फाटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
———————
उपोषणाला चांगला प्रतिसाद
उसाला टना मागे ३ हजार ५०० रुपये दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील पाच ते सहा दिवसांपासून जे उपोषण सुरु केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पंधरा ते वीस कारखान्यांनी या उस आंदोलनाची दखल घेत दर जाहीर केला. उर्वरित कारखानदार देखील लवकरच दर जाहीर करतील अशी देखील शेट्टी यांनी अपेक्षा व्यक्त केली. साधारण या आंदोलना मुळे ३०० रुपये अधिक मिळविले आहेत. त्यामुळे तीन कोटींचा जरी ऊस पकडला तर येथील शेतकऱ्यांना ९०० कोटीं रुपये मिळवुन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
——————-
कारखानदारांना माज आला आहे : शेट्टी
सध्याच्या कारखानदारांना खूप माज आलेला आहे. आपण पाहिले तर या अगोदरची कारखानदारांची पिढी त्यातल्या त्यात बरी होती. त्याच्या अगोदरची पिढी एकदम चांगली होती. आता येणारी पुढची पिढी ही याच्या पेक्षा बाद असणार आहे. एकवेळ चोर,दरोडेखोर परवडले यांच्यापेक्षा खूप भयानक निघणार असल्याचे सुतोवाच खासदार शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.
——————–
मेहनत करे मुर्गी, अंडा खाये फकीर
दोन तासा मध्ये एक टन ऊस तोडणारा मजुर ४३९ रुपये मिळवायला लागला आहे. कारखानदाराला एका टना पाठीमागे अकराशे रुपये मिळतात.प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर लावणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला बाराशे रुपये टनाला मिळतात. दुसरीकडे मात्र बारा, चौदा,सतरा महिने उस सांभाळणाऱ्या शेतकऱ्यास उस शेतीचा हिशोब केला तर एका टना पाठीमागे केवळ पंचाव्वन साठ रुपयांच्या वर काही रहात नाही. त्यामुळे मेहनत करे मुर्गी अंडा खाये फकीर अशी सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था होवून बसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.


























