माळशिरस – खाजगी सावकारांनी व्याजासह पैसे परत देण्यासाठी दिलेल्या त्रासाला कंटाळून तरूणाने आत्महत्या केली आहे. हि घटना माळशिरस तालुक्यातील मेडद गावी घडली. याप्रकरणी तीन खाजगी सावकारां विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माळशिरस पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीवरून रणजित उर्फ सोन्या श्रीकांत सोनटक्के असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याने दि. ६ रोजी राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचे काका माणिक बाबूराव सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन खाजगी सावकार पोपटराव भानुदास लवटे मेडद रामचंद्र बबन पांढरे, व अक्षय साठे (रा. नातेपुते) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ( बी एन एस )2023 कलम 108, 352, 351 (2) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 45, 39 पोलिसांत 12/12/2025 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
माळशिरस पोलिसांनी तात्काळ गुन्ह्यातील आरोपी पोपटराव लवटे व रामचंद्र पांढरे यांना अटक करून मेहरबान न्यायालयात उभे केले असता दि13 ते 15/12/2025 तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. रामचंद्र पांढरे कस्टडीत आहेत पोपटराव लवटे बीपी वाढल्याने उपचारासाठी रुग्णालयात आहेत तर अक्षय साठे फरार आहेत सदर गुन्ह्याचा तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही. सी.दिंडोरे करीत आहेत.

























