माळशिरस – खुडूस तालुका माळशिरस येथील विठ्ठल चव्हाण व संगीता चव्हाण या उभयतांनी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून प्रपंचाची आर्थिक उन्नती साधत एक आदर्श घालून दिला आहे.
एक एकर शेती सुद्धा उद्योग व्यवसायाला कशा पद्धतीने चालना देते याचा आदर्श चव्हाण दाम्पत्यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे.
खुडूस येथील चव्हाण दांपत्य एक एकर शेतामध्ये अर्धा एकर ऊस व अर्ध्या एकरामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका अशी पिके घेते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर खडूस हद्दीत रस्त्याच्या बाजूला त्यांनी गेली ५ वर्षापूर्वी कृष्णाली रसवंती ग्रह सुरू केले.
देहू आळंदी वरून शिंगणापूर, पंढरपूर,तुळजापूर, गाणगापूर कडे जाणारे भाविक भक्त व वैष्णव यांची वर्दळ याठिकाणी कायम असते.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चव्हाण दांपत्ये यांनी कृष्णली रसवंती ग्रह सुरू केलेले आहे, एका बाजूला पती-पत्नी तर दुसऱ्या बाजूला मुलगा आणि सून असतात. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रसवंती ग्रह सुरू असते.घरापासून हाकेच्या अंतरावर त्यांचा हा व्यवसाय असल्याने जवळच असलेल्या शेती आणि गाय म्हैस शेळ्या आदी जनावरांकडे त्यांना
लक्ष ठेवता येते. चव्हाण दांपत्य भाविकांना व ग्राहकांना थंडगार उसाचा रस देऊन तृप्त करतात.
कष्ट हेच भांडवल हे ब्रीद घेऊन या दाम्पत्याने रसवंती ग्रहाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधलेली आहे.
रसवंती ग्रहाच्या व्यवसायाला सुरुवात करीत असताना खडूस पर्यटन केंद्र वन विभागाच्या शेजारील रस्त्याच्या कडेला व्यवसाय असल्याने वन विभागातील कर्मचारी नारायण यशवंत बनकर, ऋषी हर्ष इलेक्ट्रॉनिक्स खुडूस मालक सुहास शामराव कुलकर्णी, सेवानिवृत्त वन अधिकारी संजय महादेव लडकत यांचे ही त्यांना नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
























