सोलापूर – बीबीदारफळ येथे लोकमंगल साखर कारखान्याने उसाला प्रतीटन ३००० ते ३,४०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रविवारी (दि.१४) शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा पर्यंत सुरूच होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, कारखान्याच्या गव्हाणीत ठिय्या मांडून गव्हाण बंद पाडण्यात आली.
कारखाना प्रशासनाकडून दोन दिवस वेळ द्या, अशी विनंती करण्यात आली होती. दोन दिवस उलटून गेले तरीही कारखाना प्रशासन मात्र तोडजोडीच्या भूमिकेत येत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम ठेवले. “ऊस आमाच्या हक्काचा.. नाही कुणाच्या बापाचा ” कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही..अशा विविध घोषणा देत कारखाना परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, मंगळवारी कारखान्याचे मालक सतीश देशमुख यांनी दुपारच्या बैठकीत शेतकऱ्यांसमोर शेवटी २८०० इतकी पहिली उचल देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र शेतकरी संघटना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उसाला किमान ३४०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले. किमान ३००० ते ३४०० रुपये दर देण्याबाबत अगोदरच निवेदन दिले. त्या वेळेस का निर्णय घेतला नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दराबाबत तोडगा निघाला नव्हता.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, उसाला तीन हजार चारशे रुपये दिल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही. यामुळे आम्ही गव्हाणीत आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


























