पंढरपूर – अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देख पिल्लांसाठी तिनं जीव झाडाले टांगला या बहिणाबाईच्या कवितेतील चिमणी आपले घरटे झाडांवर तयार करते. मात्र येथील विष्णूपद मंदिराच्या छताच्या बाजूस असलेली देवकिन्हई पक्ष्यांची घरटी प्रत्येकांचे लक्ष वेधून घेतात.विशेष म्हणजे चिमणी एवढ्या आकाराचा आणि पंख भराभर हलवून उडणाऱ्या या पक्ष्यांना भांडीक नावाने देखील ओळखले जाते.
विशेष म्हणजे लांब व रुंद शेपूट वरवर दुभंगलेली, काळसर तपकीरी मुकुट, कंठ व छातीवर आर्या असणारे हे छोटे पक्षी सातत्याने चिवचिवाट करून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ऐरव्ही खोप्या मध्ये राहणाऱ्या चिमण्यांनी देखील काड्याकुड्याच्या खोप्या ऐवजी सध्या वाळुंच्या कणापासून कायमस्वरुपी घरांचा पर्याय शोधला आहे की काय असा जणू भास ही देवकिन्हई किंवा भांडीक पक्ष्यांची घरटी पाहून झाला नाही तर नवलच म्हणावे लागेल.
निसर्ग आणि माणूस यांचे नाते किती दृढ व अतुट असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील सुप्रसिद्ध विष्णुपद मंदिर. या विष्णूपद मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात मोठी गर्दी होत असते. भाविक दर्शन घेत असताना या मंदिरात छताच्या बाजूस असलेली देवकिन्हई पक्ष्यांची घरटी लक्ष वेधून घेत आहेत. मागील गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून देवकिन्हई या पक्ष्याची घरटी इथे आहेत. अगदी हाताला येईल एवढ्या अंतरावर आहेत पण तरीही इथे येणारे भाविक या घरट्याचे नुकसान करीत नाहीत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील देवकिन्हई पक्ष्यांच्या घरट्याचे रक्षण केले असल्याने आता मंदिराच्या बाहेरील बाजूस सुध्दा यांनी आपली वस्ती विस्तारली असून या पक्ष्यांची संख्या मोठी वाढली असल्याचे येथील पक्षीमित्र आवर्जुन सांगतात.
देवकिन्हई पैक्षांच्या घरट्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लाळ व मातीचे गोळे एकत्र करून चिकटवून अत्यंत सुबक अशा गारुड्याच्या पुंगीसारखी त्यांची घरटी बनविलेली असतात. भिंतीचे कोपरे, छते, पुलांच्या कमानी, घुमट वगैरे ठिकाणी ती चिकटविलेली असतात. हे पक्षी जमावाने राहणारे असल्यामुळे १०० ते १५० घरटी एके ठिकाणी असतात. मादी दोन-चार पांढरी अंडी घालते. नर मादी मिळून दोघेही पिल्लांचे संगोपन करतात. घरट्यांचा उपयोग रात्री झोपण्याकरिता व विश्रांतीकरिता होतो.
————————–
देवकिन्हई पक्ष्यांची जिद्द वाखणण्याजोगी
देवकिन्हई पक्ष्यांची जिद्द वाखाणण्याजोगी असते. मनुष्य थोड्या अपयशाने लगेच खचून जातो, पण या पक्ष्यांचे तसे नाही, नदीला पूर आला की मंदिर पाण्यात जाते, पुराच्या पाण्यात घरटी वाहून जातात, पण हे पक्षी हिंमत हरीत नाहीत. पुन्हा नव्या जोमाने पूर ओसरला की देवकिन्हई पक्षी आपली घरटी बनवितात.
—————————–
फेब्रुवारी ते सप्टेंबर हा या पक्ष्यांचा वीणीचा हंगाम असतो
साधारणपणे किल्ले, पडक्या मशिदी, ओसाड हवेल्या व देवळे अशा ठिकाणी यांचे वास्तव्य असते. उडणारे किडे हे यांचे भक्ष्य होय. हवेत उडत असतानाच ते आपले भक्ष्य पकडतात. जवळजवळ सगळा दिवस ते अवकाश विहारामध्ये घालवितात. ह्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंत असतो.
——————————-
महत्वाचे मुद्दे – श्री विष्णुपदावरील भांडीक किंवा देवकिन्हई पक्ष्यांची घरटी ठरताहेत लक्षवेधक. अत्यंत सुबक गारुड्याच्या पुंगीसारखी घरटी. पक्ष्यांच्या चिवचिवाटामुळे परिसरात रम्यता. घरट्यामधून मिळते जिद्द आणि एकीचे दर्शन. हे पक्षी जमावानेच उडत असतात. भाविक या घरट्याचे नुकसान करीत नाहीत. या पक्ष्यांची जिद्द वाखाणण्याजोगी.


























