सोलापूर – विशेष (दिव्यांग) मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या वतीने ‘यहाँ के हम सिकंदर’ या विशेष कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूरच्या हरीभाई देवकरण प्रशालेतील मुळे सभागृह येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई यलगुलवार यांनी दिली.
बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. नीलम ताई शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. दिव्यांग बालकलाकारांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासात भर टाकणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवाचे स्वरूप आणि आकर्षणे
या महोत्सवात १८ वर्षांखालील दिव्यांग बालकलाकार आपले कौशल्य सादर करणार आहेत. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल – नृत्य, गायन, वादन आणि चित्रकला या माध्यमांतून मुले आपली कला सादर करतील.
प्रोत्साहन आणि सन्मान: हा महोत्सव स्पर्धात्मक नसून कौतुकाचा सोहळा आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक शाळेला ३,००० रुपये मानधन आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तसेच, प्रत्येक सहभागी बालकलाकाराला प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल्स लावले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग शाळांनी आणि वैयक्तिक स्तरावर दिव्यांग बालकलाकारांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
”विशेष मुलांच्या कलागुणांना दाद देणे हे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मुलांचा उत्साह वाढवावा आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून त्यांचा आनंद द्विगुणित करावा.” असे आवाहन सीमा यलगुलवार यांनी केले आहे.


























