सोलापूर – दिव्यांग सक्षमिकरण विभागा सुरु करण्याचा आदेश आल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी घाईगडबडीत जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र, दिव्यांगांना तिथे जाण्यायेण्यासाठी मोठी अडचण आहे. तेव्हा हे कार्यालय तळमजल्यावर हालवा, अशी मागणी प्रहार क्रांती आंदोलनाचे जिल्हा संघटक भीमाशंकर लोखंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी जंगम यांना दिलेल्या निवेदनात लोखंडे यांन म्हटले आहे की, सप्टेबर पासून स्वतंत्र दिव्यांग सक्षमिकरण विभागाचे जिल्हा कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र, हे कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. त्यामुळे दिव्यांगांना पाय-या चढून जाण्या- येण्यासाठी खूप शारिरीक त्रास होत आहे. जिथे दिव्यांगांना एकवेळ जाताना त्रास होतो. तिथे त्यांना योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी जाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना वेळेवर कामे करता येणार नाही. तेव्हा हे कार्यालय तळमजल्यावर सुरु केले तर त्यांना येणे-जाणे सोईेचे होईल. त्यांना वावरणे सोईचे होईल. तेव्हा हे कार्यालय तळमजल्यावर सुरु करावे.
याबाबत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय न्यास व राज्य शासनाच्या मर्यादित पालकत्व जिल्हा समितीचे सदस्य दत्तात्रय मोकाशी यांना विचारले असता ते म्हणाले की, तत्कालीन प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी जागा उपलब्ध नसल्यामुळे व राज्याचे दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे यांनी कार्यालय तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिल्यामुळे पहिल्या मजल्यावर कार्यालय सुरु केले. त्यावेळी देखील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय तळमजल्यावर सुरु करा, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा तात्पुरत्या स्वरुपात आपण कार्यालय इथे ठेवू पुन्हा हालवू, असे सोनवणे यांनी सांगितले होते. तीन महिने उलटले तरी देखील कार्यालय पहिल्याच मजल्यावर आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कार्यालयात येण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे कार्यालय तळमजल्यावर असणे गरजेचे आहे. न्यासाच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्याकडेही हा मुद्दा लावून धरणार आहे.


























