नायगाव / नांदेड – दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीच्या संरक्षण व आध्यात्मिक जागृतीचा संदेश देणारी गोदावरी परिक्रमा यात्रा मलूक पीठाधीश्वर राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज यांच्या सान्निध्यात सुरू असून दि. १७ डिसेंबर रोजी ही यात्रा नायगाव तालुक्यातील नरसी नगरीत दाखल झाली.
महामंडलेश्वर लक्ष्मणदास महाराज (भीलवाडा), चिन्मय बापूसह देश भरातील विविध आखाड्यातील साधू-संत व महंतांच्या उपस्थितीत निघालेल्या या यात्रेचे स्वागत करण्यासाठी नरसी व परिसरातील हजारो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावल्या होत्या. पुष्पवृष्टी, हरिनामाचा गजर,“जय जय श्रीराम” व “ भगवान श्रीकृष्णाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या यात्रेतील साधू-संतांचे दर्शन व आशीर्वादासाठी भगवान बालाजी मंदिरातील पद्मावती मंगल कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार खा. अशोकराव चव्हाण यांनी राजेंद्र दास देवाचार्य जी महाराजांसह उपस्थित सर्व साधू-संत व महंतांचे नांदेड जिल्ह्यातील भाविकांच्या वतीने यथोचित स्वागत व सन्मान केला.
दरम्यान, नरसी येथील श्री तुळजा भवानीची जिनिंग फेडरेशनचे नूतन चेअरमन श्रावण भिलवंडे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी सदिच्छा भेटी प्रसंगी श्रावण भिलवंडे मित्र मंडळाच्या वतीने खा. अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी रसीक संत किशोर दास महाराज(वृंदावन),गोवत्स बालयोगी
व्यंकट स्वामी महाराज, महंत स्वामी शांतीब्रह्म यदुबन महाराज (कोलंबीकर) यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. तसेच माजी आ. अमर राजूरकर, चेअरमन श्रावण भिलवंडे, शिवसेना (उबाठा) गटाचे तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, सरपंच गजानन भिलवंडे, नंदकिशोर टोकलवाड, राजू गंदीगुडे, राजेश भिलवंडे, मोहन भिलवंडे, वसंत मेडेवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
भगव्या पताका,ढोल-ताशांचा निनाद आणि मालिकांच्या अपार श्रद्धेमुळे नरसी नगरीत दिवसभर अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. गोदावरी परिक्रमा यात्रेने नरसीच्या धार्मिक परंपरेत एक अविस्मरणीय अध्याय जोडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


























