कुर्डुवाडी – शाळकरी लहान चिमुकल्यांच्या बाबतीत कुर्डूवाडी परिसरामध्ये चालु असलेल्या खाजगी शाळा त्यांचे प्रशासन मुलांची वाहतुक करणा-या स्कुलबसच्या बाबत किती बेजवाबदार व बेपर्वा आहेत हे एखाद्या कोंबड्याच्या खुरवड्याप्रमाणे खचाखच भरलेल्या नियमभाय्य विद्यार्थी संख्येवरून दीसुन येते. बेजवाबदार बसचालकावर कारवाई तर कोण करणार असा प्रश्न उपस्थीत होतो आहे. विशेष म्हणजे अकलुजच्या आरटीओ कार्यालयाकडून याबाबत कोणतीही कारवाई न करता उलटपक्षी संस्थाचालकांच्या मैत्रीपुर्ण सबंधामुळे सहकार्यच होते की काय असे चित्र दिसत आहे.
खासगी शाळा विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा, सुरक्षित प्रवास आणि वेळेची काटेकोरता असा दावा करून पालकांकडून दरमहा दीड ते अडीच हजार रुपये शुल्क आकारतात. मात्र, बसेसची सुरक्षितता, चालकांचे प्रशिक्षण आणि शाळांची देखरेख याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शालेय मुलांचे जीव धोक्यात सापडले आहेत.
कुर्डुवाडी व परिसरात स्कूलबसची ने-आण होताना मूलभूत वाहतूक नियमांचा सर्रास उल्लंघन होते. शाळेजवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी बस थांबवून मुलांना उतरवण्याचे सामान्य ज्ञानही चालकांकडे नाही. अरुंद रस्ते किंवा वळणांवर बस अचानक थांबवली जाते. मागून-सामोरून वेगवान वाहने धावत असताना रस्ता ओलांडणाऱ्या मुलांच्या अपघाताची जोखीम संभवते.
केअरटेकर फक्त नावापुरता
राज्य परिवहन विभागाच्या नियमांनुसार, शालेय बसमध्ये केअरटेकर अनिवार्य आहे. मात्र, अनेक बसेसमध्ये ते नसतात किंवा फक्त पुढील सीटवर बसून ओरडतात. लहान मुलांचे हात धरून उतरवणे, रस्ता पाहून बाजूला उभे करणे, दार बंद आहे का किंवा मुले व्यवस्थित बसली आहेत का? या जबाबदाऱ्या पार पाडल्या जात नाहीत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार- बसच्या खिडक्या जाळ्या किंवा ग्रिलने बंद असाव्यात. मात्र, खासगी शाळांच्या बसेसमध्ये हे पालन होत नाही. काही खिडक्या उघड्या, जाळ्या तुटलेल्या किंवा सैल, तर कुठे जाळीच नाही. दुरुस्तीचा खर्च टाळण्यासाठी वर्षानुवर्षे जुन्या बसेस धावतात.तर काही शाळामध्ये टमटम,ओमिनी कार व जिपमधूनही नियमांचे उल्लघन करून मुलांची वाहतूक केली जाते तरीही आरटीओ अगर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचे दीसते.
नुकताच घडलेला धक्कादायक प्रकार-
शहरातील अरुंद रस्त्यावर घडलेल्या घटनेने स्कूलबस सुरक्षेची ढिसाळ व्यवस्था उघड झाली.
शुक्रवार दि.१२ रोजी माढा रोडवरील एका वसाहतीमध्ये खासगी गाड्या उभ्या असलेल्या रस्त्यावरून स्कूल बस आत घुसवताना मागील सीटवरील सात-आठ वर्षांचा मुलगा खिडकीतून कमरेपर्यंत बाहेर डोकावला. चालकाने आरशात हे दिसत असूनही गाडी पुढे चालवली. खांबाला धडक बसली असती तर गंभीर अपघात झाला असता. केअरटेकर होता की नाही, यावर प्रत्यक्षदर्शींमध्ये संभ्रम आहे. स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “मोठी दुर्घटना होईपर्यंत डोळे उघडणार नाहीत का?” असा सवाल केला.ही बस बार्शी रोडवरील एका शाळेची असल्याचे सांगण्यात येते.
नियम जाहीर, अंमलबजावणी शून्य
परिवहन व शिक्षण विभागाने स्कूलबससाठी कठोर नियम आखले आहेत: चालकाकडे वैध व्यावसायिक ड्रायव्हर परवाना, वाहनाची फिटनेस, प्रदूषण तपासणी, विमा अद्ययावत; दरवर्षी तांत्रिक तपासणी; “SCHOOL BUS” लेबल; आपत्कालीन दार, फायर एक्स्टिंग्विशर, फर्स्टएड किट, विद्यार्थी-पालक यादी. मात्र, अंमलबजावणी पूर्णपणे नाही. चालकांना स्कूलबस विशेष प्रशिक्षणच मिळत नाही.याकडेही आरटीओ ने लक्ष देण्याची गरज आहे.
शाळांची जबाबदारी टाळता येत नाही-
खासगी शाळा वाहनमालकांशी करार करून “बस खासगी आहे” म्हणत जबाबदारी टाळतात. पालकांचा असाच अनुभव आहे. मात्र, शाळेच्या नावाने विद्यार्थी ने-आण होत असल्याने शाळा मोकळ्या होऊ शकत नाहीत.
पालकांनी घ्यावयाची काळजी
चालकाचा परवाना, वाहन फिटनेस व विमा याची लेखी माहिती शाळेकडून घ्या.बसची प्रत्यक्ष पाहणी करा: खिडक्या, दरवाजे, फायर एक्स्टिंग्विशर, फर्स्टएड किट तपासा. खिडकीतून हात-डोके बाहेर काढू नये हे घरीच मुलांना शिकवा, बस मध्ये धावधाव न करणे.”विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत कोणत्याही शुल्कापेक्षा मोठी आहे. छोटी बेपर्वाही आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. पालकांनो जागरूक होऊन मुलांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करा.
विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत आपण सर्व शाळांना काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.स्कूलबस मध्ये केअर टेकर ठेवणे गरजेचे आहे.तसेच प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समिती असते. महिन्याला या समितीची मीटिंग घेतली जाते यामध्ये पालक मुख्याध्यापक आणि कमिटी यामध्ये स्कूलबस फी व इतर सुरक्षा मुद्द्यावर चर्चा केली जाते. वरील संदर्भात शाळेचे नाव समजले असते तर त्यांना आपण नोटीस देऊ.
विकास यादव( गट शिक्षण अधिकारी माढा पंचायत समिती, कुर्डुवाडी)
मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आजपासून कुर्डुवाडीमध्ये तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश काढतो आणि कारवाई करतो.
—–अमरसिंह गवारे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार)


























