सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांना महानगरपालिकेकडून विविध ना-हरकत प्रमाणपत्रे (एन ओ सी) सादर करणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने नॉर्थकोट प्रशाला येथे सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षात प्रमाणपत्रासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. आज पहिल्याच दिवशी ६३० अर्ज दाखल झाले आहे. दरम्यान, आज मंगळवारपासून अर्ज देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेसाठी मालमत्ता कराचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या नावावर गाळा (दुकान) असल्यास त्यासाठी स्वतंत्र ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार असून, खुली जागा असल्यास त्या मिळकतीबाबतही संबंधित विभागाकडून एनओसी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवार व्यवसाय करीत असल्यास, संबंधित व्यवसाय परवाना (लायसन्स) वैध असल्याचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.याशिवाय, उमेदवार महानगरपालिकेचा मक्तेदार (ठेकेदार) आहे किंवा नाही, याबाबतचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वरील सर्व माहितीबाबत उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र सुद्धा अनिवार्यपणे सादर करावे लागणार असून, त्यामधील माहिती सत्य व अचूक असल्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. महापालिकेच्या वतीने नॉर्थकोट प्रशाला येथे एक खिडकी कक्ष कार्यालयीन वेळेत सुरु आहे. उमेदवारांनी मिळकत करा संदर्भात ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र काढून अर्ज सोबत जोडावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
उपायुक्त आशिष लोकरे यांनी केल्या विविध सूचना
नॉर्थकोर्ट प्रशाला येथील सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी सुरू केलेल्या एक खिडकी कक्ष आणि अन्य कार्यालयांची महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. बराचवेळ ते या परिसरात तळ ठोकून होते. यादरम्यान लोकरे यांनी गर्दी होऊ नये, सर्वांना सुलभ पद्धतीने अर्ज दाखल करता यावेत आणि प्रमाणपत्र उपलब्ध करता येईल या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी परिसरात थांबून आलेल्या इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.
31 डिसेंबर रोजी होणार अर्ज छाननी
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी
अर्ज देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया दि. 23 ते 30 डिसेंबर 2025, अर्ज छाननी दि. 31 डिसेंबर 2025 असून त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंत मुदत राहणार आहे. दिनांक 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशीच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. दि. 19 जानेवारी 2026 पर्यंत निकाल शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

























