सोलापूर : उद्योगपती स्व. जयकुमारजी पाटील यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संस्थाची लोकसहभागातून भक्कम उभारणी केल्यामुळे सोलापूर शहरातील लोकजीवन समृद्ध झाले. त्यांनी आयुष्यभर साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आदर्श जोपासला म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे असे प्रतिपादन आई प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन डांगरे यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक स्व. जयकुमारजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक डॉ. अशोक पाटील होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गुंड, मुख्याध्यापक मारुती मडवळी, भारत केत, उपप्राचार्य डॉ. किशोर पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जयकुमार पाटील यांनी शहर विकासाचा ध्यास घेतला होता. त्यातून त्यांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढी स्थापना केली. त्यामुळे रुग्णांना जीवदान मिळाले. प्रभात चित्रपट गृह, पर्यटन आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यामुळे सोलापूरकरांचे सांस्कृतिक विश्व समृद्ध झाले. लक्ष्मी उद्योग समूहाची स्थापना करून हरित क्रांती घडवून लाणाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात लक्षणीय परिवर्तन झाले. हेच त्यांचे कार्य आत्मसात करणे गरजेचे आहे.
उद्योजक डॉ. अशोक पाटील म्हणाले की, सोलापूरच्या जडणघडणीत योगदान देत असताना जयकुमारजींनी कौटुंबिक जबाबदारीदेखील समर्थपणे सांभाळली. आमच्यावर चांगले संस्कार केले. दर्जेदार शिक्षण दिले. त्यामुळे आम्हीदेखील सक्षम झालो. आता त्यांचे विचार व वारसा आमचे कुटुंबीय सातत्याने पुढे नेत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. सूत्रसंचालन मृदुला मोहोळकर यांनी केले. तर प्रा. देवराव मुंडे यांनी आभार मानले.
चौकटीतील मजकूर
१. स्व. जयकुमारजी पाटील नव उद्योजिका पुरस्कार वितरण
स्व. जयकुमारजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्या वतीने दिला जाणारा ‘स्व. जयकुमारजी पाटील नव उद्योजिका पुरस्कार’ यावर्षी मेघा मोहिते आणि अंकिता पवार या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिलाई मशीन, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यार्थिनींना स्वावलंबनाची दिशा मिळावी म्हणून हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो.
२. शिक्षक व विद्यार्थिनींनी केले रक्तदान
दरम्यान स्व. जयकुमारजी पाटील यांच्या स्मरणार्थ डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. यासाठी डॉ. आनंद वैद्य, सौख्या देसाई, रूपाली लोंढे, राजू गुजर आणि पार्वती कोळी यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ:
१. स्व. जयकुमारजी पाटील नव उद्योजिका पुरस्कार प्रदान करताना आई प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन डांगरे, उद्योजक डॉ. अशोक पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे व मान्यवर
२. स्व. जयकुमारजी पाटील यांच्या जीवन कार्याबद्दल विचार व्यक्त करताना आई प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन डांगरे, उद्योजक डॉ. अशोक पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे व मान्यवर


























