सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुरुवारी सकाळी ९ वाजता श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात यशवंत स्मृती गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अभाविपच्या महानगरमंत्री अनघा जाधव यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व प्रचारक श्याम जाजू (दिल्ली) यांचे मुख्य मार्गदर्शन होणार असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी विशेष निमंत्रित सदस्य प्रा. प्रशांत साठे तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेत आणि विस्तारात प्रा. यशवंतराव केळकर यांचा सिंहाचा वाटा आहे. यंदाचे वर्ष प्रा. यशवंतराव केळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापुरात यशवंत स्मृती गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व पूर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर विभागाचे महानगर अध्यक्ष प्रा. प्रशांत चाबुकस्वार यांनी केले आहे.

























