सोयगाव / संभाजीनगर – सोयगाव तालुक्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत- विमुक्त जाती-भटक्या जमाती घरकुल योजना अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्तावांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी अतुल सावे,इतर मागासवर्गीय मंत्री,महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सोयगाव तालुक्यातील निंबायती,जरंडी व बहुलखेडा येथील नागरिकांचे घरकुल प्रस्ताव मंजूर झालेले असतानाही अद्याप निधी वितरित झालेला नसल्याने लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले.निधीअभावी अनेक घरकुलांची कामे रखडलेली असून,लाभार्थ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे यावेळी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
सदर निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांनी मंत्री महोदयांना सादर करून,संबंधित योजनेंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी केली.निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थ्यांना वेळेत घरकुल पूर्ण करता येऊन त्यांना सुरक्षित निवारा मिळेल,असेही त्यांनी सांगितले.अतुलजी सावे यांनी या विषयाची दखल घेऊन संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

























