बार्शी – बसस्थानकची दूरवस्था दूर करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन पुन:बांधणीसाठी १० कोटी ७७ लाखांचा भरघोस निधी मिळवला असून राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहॆ.
आ. सोपल पत्रकाद्वारे म्हणतात की, मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले बार्शी बसस्थानक पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वाधिक मोठे उत्पन्न देणारे बसस्थानक असताना मोठी दुरावस्था होती, इमारत अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
आ. सोपल म्हणाले की, या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून तसेच वर्तमानपत्रामधून वारंवार प्रसिद्ध होत असलेली दुरावस्थेची छायाचित्रे, बातम्यासह परिवहनमंत्री ना. प्रताप सरनाईक यांना समक्ष भेटून व्यथा मांडली होती.
दरम्यान बी.ओ.टी. तत्वावरील प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता. मात्र फिजिबिलीटी नसल्यामुळे याबाबतची कार्यवाही पुढे होत नव्हती या पार्श्वभूमीवर ते जेव्हा होईल तेव्हा होऊ द्या, आताची दुरावस्था बघवत नाही. त्यामुळे शासनाने स्वनिधीतून दुरावस्था दूर करण्याची मागणी लावून धरल्यानंतर ना. सरनाईक यांनी याबाबत आदेश देऊन मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन दिला. त्याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.
बस स्थानक चौक येथे होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी आगारात येणाऱ्या एस.टी. बस वेअर हाऊस रोडच्या बाजूने प्रवेशद्वार केल्यास स्टॅन्ड चौकातील वाहतूक कोंडीतून सुटका होईल. तशा सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे प्रवेशद्वारसाठी भिंत पाडून गेट बसविण्यात आले आहॆ. ते लवकर सुरु करण्याची कार्यवाही लवकरच होईल, असेही आ. सोपल यांनी पत्रकात म्हटले आहे.


























