हदगाव / नांदेड – हिमायततनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व विशेष प्रयत्नातून तालुक्यातील वायपणा गावाजवळील मुख्य रस्त्यावरील मोठ्या नाल्यावर नवीन पूल बांधण्यासाठी राज्याच्या पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात तब्बल ७.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. कोहळीकर यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. या पुलाच्या बांधकामामुळे वायपना खुर्द, वायपना बुर्ज, येवली तसेच परिसरातील इतर गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद होण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार असून शालेय विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांची होणारी गैरसोय थांबणार आहे. नवीन पुलामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार असून दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होईल यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळणार असून नागरिकांच्या सुरक्षेतेतही वाढ होणार आहे.
या महत्वपूर्ण विकास कामासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल वायपणा व परिसरातील ग्रामस्थांनी आ. बाबुराव कदम कोहाळीकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


























