पंढरपूर – तालुक्यातील आंबे जि.प.शाळेचे शिक्षक प्रशांत ठाकरे यांची आत्मचरित्र लेखन स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे.नुकत्याच पुणे येथे विभागीयस्तरावर झालेल्या आत्मचरित्र लेखन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे पालघर जिल्हा मध्ये पार पडणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठाकरे हे पात्र झाले आहेत.
शासनातर्फे शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकूण ३३ स्पर्धा तालुकास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कला, क्रीडा, साहित्य यांमधील विविध स्पर्धा प्रकार अंतर्भुत आहेत.तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक एका स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तालुक्यातील सर्व शिक्षक प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत अशी अपेक्षा होती. त्यानुसार आंबे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रशांत ठाकरे यांनी आत्मचरित्र लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धे मध्ये लेखनासाठी एकूण चार हजार शब्दांची मर्यादा होती.
दरम्यान तालुकास्तरीय स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विभागीय स्तरासाठी पात्र ठरवण्यात आला होता. त्यानुसार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथील नारायण पेठेतील रमणबाग हायस्कुल येथे विभागीय स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आणि राज्यस्तरासाठी प्रशांत ठाकरे यांची निवड झाली.येत्या काळात पालघर जिल्ह्यामध्ये पुढील फेरी पार पडणार आहे.
या सुयशाबद्दल पंढरपूर तालुक्यातील सर्व शिक्षक, चळे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर घाडगे, पंढरपूर पं.समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रशांत ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

























