जालना – सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केली जाणारी पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी व प्रेरणादायी असून पत्रकारांनी सामाजिक भान जपत जबाबदारीने लेखन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केले.
प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना शाखेतर्फे आयोजित दर्पण दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, पंडित भुतेकर, सर्जेराव जाधव, वाघ महाराज, विनायक दहातोंडे, रमेश खोत, भरत मानकर, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खोतकर पुढे म्हणाले की, पत्रकारिता हे केवळ बातमी देण्याचे साधन नसून समाजातील दुःख, वेदना, प्रश्न आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे. जालना शहरातील रेशीम बाजारपेठ व मोसंबी बाजारपेठेच्या विकासात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे. पत्रकारांनी वास्तव मांडल्यास त्याला कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्याची संधी मिळते. मात्र नकारात्मकतेवर आधारित लेखन समाजमन दूषित करते. म्हणून पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लेखन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी व निर्भीड पत्रकारितेची उदाहरणेही दिली.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक
दर्पण दिनानिमित्त उपस्थितांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या पत्रकारितेचे महत्व अधोरेखित केले. दि. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र मानले जाते. इंग्रजी सत्ताकाळात समाजात प्रबोधन, शिक्षण, विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक सुधारणांचा प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले.
बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते, तर ते एक विचारवंत, शिक्षक, इतिहासकार आणि समाजसुधारक होते. त्यांनी पत्रकारितेला केवळ राजकीय घडामोडीपुरती मर्यादित न ठेवता समाजाच्या सर्वांगीण विकासाचे साधन बनवले. सत्य, विवेक, निर्भीड मांडणी आणि लोकजागृती हीच पत्रकारितेची खरी ओळख असल्याचे त्यांनी आपल्या लेखनातून सातत्याने अधोरेखित केले. आजच्या डिजिटल युगातही त्यांच्या मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ज्येष्ठांनी दिला मार्गदर्शनाचा मंत्र
कार्यक्रमात बोलताना अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख म्हणाले की, पत्रकारांनी उथळपणा दूर ठेवून वास्तव लेखन करावे. पत्रकाराने सातत्याने सत्यशोधकाची भूमिका बजावली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्राबल्य वाढले असले तरी आजही सर्वसामान्य माणसाचा मुद्रित माध्यमांवरील विश्वास अबाधित आहे. माध्यमांचे स्वरूप बदलले असले तरी पत्रकारांनी विश्वासार्हता जपणे ही काळाची गरज आहे.
माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही दर्पण दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देत समाजघडणीत पत्रकारितेचे महत्व अधोरेखित केले. ज्येष्ठ पत्रकार लियाकत अली खान यासेर, अच्युत मोरे यांनीही पत्रकारांना मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, विनायक दहातोंडे, रमेश खोत, लियाकत अली खान यासेर, अहमद नूर, अभयकुमार यादव, बद्री उपरे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेंद्र घुले, विलास खानापुरे, ओमप्रकाश शिंदे, रमेश बोबडे, आयेशा खान मुलानी, शिवकुमार भारुका, अंकुश गायकवाड आदींचा सप्तनीक सहपरिवार सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील दीडशेवर पत्रकार, जाहीरात प्रतिनिधी यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रेस कॉन्सीलच्यावतीने शहरात पेपर वाटप करणार्या मनोज गरदास व ज्ञानेश्वर बुरला या दोन मुलांना सायकल भेट देण्यात आली.
दरम्यान, कार्यक्रमात संपादक बाबासाहेब आटोळे यांच्या ‘दैनिक त्रिकाल संघर्ष’ या वृत्तपत्राचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी नव्या वृत्तपत्रास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले. प्रस्ताविक विधिमंडळ व मंत्रालय संपादक पत्रकार संघाचे प्रदेश सचिव भरत मानकर यांनी केले. प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्पण सकाळचे आमेर खान, शेख चाँद पी.जे., विष्णु कदम, बाबासाहेब आटोळे, सुहास वैद्य, शेख अशफाक, बाबासाहेब कोलते, सुनील भारती, आशिष तिवारी, माणिक जैस्वाल, दिनेश नंद, सय्यद सलमान, सुनील नरवडे, निकिता काळे, शेख महेजबीन आदींनी परिश्रम घेतले.

















