सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरातील नाला क्र. २० (पोगुल विहार ते हैदराबाद रोड) तसेच नाला क्र. २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या पर्जन्य जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.ड्रेनेज व पर्जन्य जलवाहिनी वेगळी ठेवण्याचे निर्देश दिले. नियमबाह्य जोडण्या आरोग्यास अपायकारक असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, एन्व्हायरोसेफ कन्सल्टंटचे टीम लीडर गोकुळ चितारी, हर्षवर्धन बुबणे, रेसिडेंट इंजिनिअर चंद्रकांत गुंडे, रोहन तोगरे, रोहित गोडगे, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे, साईट इंजिनिअर चरणू शिंदे, राहुल यातकर, मनोज जाधव, सागर करोसेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी सुरू असलेली कामे सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) राबविण्यात येत असून, पर्जन्य जलवाहिनीचे योग्य प्रकारे ट्रेनिंग करणे, काही ठिकाणी नाले बंदिस्त करणे, आवश्यक ठिकाणी पाईप टाकणे आदी कामांचा समावेश आहे. पर्जन्य जलवाहिनी ही मुख्यतः पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असते; मात्र शहरातील काही भागात ड्रेनेजचे पाणी या जलवाहिनीत मिसळून ते वर्षभर वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी त्यांनी कामाची गुणवत्ता, वेळापत्रक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी व ड्रेनेज यांची स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळणे आरोग्यास अपायकारक
पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळणे हे नियमबाह्य व आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट करताना आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी यामुळे पावसाळ्यात नाले ओव्हरफ्लो होऊन सखल भागांत पाणी साचणे, तसेच रहिवासी व झोपडपट्टी भागात पाणी शिरण्यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचे नमूद केले.

















