मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादातून एका टोळक्याने जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यावसायिकाच्या गाडीची तोडफोड केली तसेच जर हे प्रकरण मिटवण्यासाठी व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी 6 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=LjULg_dMbz4
काय आहे संपूर्ण प्रकरण…
वांद्रे पश्चिम येथील व्यावसायिक आशिष यादव व त्यांचे मित्र क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉकडे सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. पृथ्वी शॉने त्यांच्यासोबत सेल्फी काढला, पण ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करू लागले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले. याचा गोष्टीचा राग आल्याने संतप्त झालेल्या गिल व ठाकूर यांनी आपल्या बाकी साथीदारांना त्या ठिकाणी बोलावले.
त्यांचे बाकी साथीदार त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी आशिष यादव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीचा पाठलाग केला आणि लोटस पेट्रोल पंपजवळ पोहोचताच बेसबॉल स्टीकने त्यांच्या गाडीची पुढची व मागची काच फोडली. यादरम्यान यादव यांच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर आणली. त्या ठिकाणीदेखील आरोपींनी यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप आशिष यादव यांनी केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी खंडणीचा व बेकायदेशिररित्या जमाव जमवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.