सोलापूर : महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये तत्व सोडून, विचार सोडून अभद्र युती बघायला मिळत आहेत. पक्ष आणि विचार आता महत्त्वाचा राहिला नाही तर सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. मतदारांनी आता अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर केले पाहिजे. टेंडर मिळविण्यासाठी निवडून आले पाहिजे आणि त्यासाठी खून ही करण्यात येतो. महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात यापूर्वी बिनविरोध येण्यासाठी प्रयत्न केले होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेसाठी सोलापुरात आले असताना सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी मी सांगितले होते की राज्यात अभद्र युती पाहायला मिळेल. अगदी त्याप्रमाणेच महाराष्ट्रात भाजप एमआयएम आणि भाजप काँग्रेस यांची युती झाली असल्याचे पाहिले. ही अभद्र युती आहे. अभद्र युती प्रकरणी काँग्रेसने कारवाई केली मात्र 24 तास उलटूनही भाजपाने कारवाई केली नसल्याचे दिसून येते. आता राजकारणात पक्ष आणि विचार महत्त्वाचा राहिला नाही सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर महत्वाचे झाले आहे एका बाजूला देशावर संकट आहे दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर देश हाकण्याची धुरा आहे ते अनैतिक पद्धतीने वागतात. अशा अनैतिकतेने वागणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा , असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.
दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली ही समाजवादी विचारांची युती आहे. नांदेड, लातूर येथे काँग्रेस बरोबर वंचितने युती केली आहे. जिथे पाटीलशाही ने लोकशाही स्वीकारली तिथे आम्ही युती केली. इतर ठिकाणी शक्य झाली नाही, असे ते म्हणाले. काहीजण मनाने एकीकडे तर शरीराने दुसरीकडे अशी स्थिती राजकारणात पाहायला मिळत आहे. सन 2014 पासून आम्हाला दूर ठेवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था भाजपा सांगेल तसे नाचण्यासारखी स्थिती झाली आहे. त्या सगळ्यांची रिपाइं झाली असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.
बिनविरोध निवडणुका संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, दबावाचे, धमक्याचे राजकारण चालले आहे. महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चालला आहे. आता मारण्यापर्यंत ते विकत घेण्यापर्यंत प्रकार चालला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अर्धे उमेदवार भीतीपोटी अर्ज भरायला आले नाहीत. त्यांना दम दिला असल्याचा आरोपही यावेळी ॲड. आंबेडकर यांनी केला. युद्ध टाळण्यासाठी या निवडणुकीत भाजपा विरोधात मत द्या. महापालिका गटारात अडकली आहे. या निवडणुकीत पैसे वाटणाऱ्याला मत देऊ नका. पैसे घ्या पण पैसे न देणाऱ्यांना मतदान करा, असे आवाहनही यावेळी ॲड. आंबेडकर यांनी केले.
दरम्यान, काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही सोलापुरातील त्यांच्या एका निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा चळवळीतील पक्षाचे उमेदवार मल्लपा शिंदे हे टिकून राहिले होते, अशी आठवणही ॲड. आंबेडकरी यांनी करून दिली.
या पत्रकार परिषदेस प्रभारी सोमनाथ साळुंखे, प्रवक्ते अरुण जाधव, डॉ. नितीन ढेपे, चंद्रशेखर मडीखांबे, महेश जाधव, आतिश बनसोडे आदी उपस्थित होते.
ड्रग्ज प्रकरणी मोदी, शहा यांनी खुलासा करावा
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ड्रग्ज प्रकरणी केलेल्या विधानासंदर्भात विचारले असता ॲड. आंबेडकर म्हणाले, शासन, गृहमंत्र्यांच्या देखरेखीखाली हा विभाग असताना असे घडले कसे असा सवाल उपस्थित करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात खुलासा करावा, असे आवाहन केले.
दोन्ही पवारांनी भाजपला उल्लू बनवले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही वेगळे नाहीत. ते एकत्र आहेत. त्यांनी मिळून भाजपाला उल्लू केले आहे. दोघांचीही चौकशी थांबविण्यासाठी त्यांनी तसं केले. आतापर्यंत त्यांची केस भाजपाने दाबून का ठेवली याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, असेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
कुणाच्या रक्तात किती भाजप आहे ? ते लवकरच दिसेल
सोलापुरात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केला. त्यानंतर खा. प्रणिती शिंदे यांनी माझ्या रक्तात काँग्रेस आहे असे म्हटले आहे. या संदर्भात बोलताना ॲड. आंबेडकर पुढे म्हणाले, कोणाच्या रक्तात किती भाजप आहे ? ते लवकरच दिसेल ? दूध का दूध पाणी का पाणी बघायला मिळेल, असे त्यांनी असे ते म्हणाले.


















