सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ मध्ये होम टू होम प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. वसंत विहार, गायत्री नगर, मडकी वस्ती, वारद फार्म हद्दवाढ परिसरात राबविण्यात आलेल्या या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्षाचे उमेदवार आनंद चंदनशिवे, भाग्यश्री काळे, महादेवी रणदिवे व गणेश पुजारी यांनी गणेश नगर, मडकी वस्ती, वारद फार्म, लक्ष्मी महादेवी नगर, गायत्री नगर, वसंत विहार व गुलमोहर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व विकासविषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गेल्या आठ वर्षांत आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेली विकासकामे, मूलभूत सुविधांचा विस्तार व नागरिकाभिमुख कामकाज याची दखल घेत पुढील काळातही चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.
या प्रचारावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तांबे, उमर शेख, रवींद्र काळे, उमेश रणदिवे, हृदयनाथ मोकाशी, बलवीर तीर्थकर, बिभिषण बाकले, मनोज थोरात, सोमनाथ करंडे, मुकेश मोकाशे, किरण वाळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















