बार्शी – लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणारी अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनी ३ जानेवारी सावित्रीमातेच्या जन्मदिनी सकाळी नऊच्या दरम्यान तिच्या कॉटवर बसून टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप तिच्या आई-वडिलांना जवाहर नवोदयचा प्रशासनाकडून मिळाला होता. परंतु ती आत्महत्या नसून तिची हत्या असल्याचे तिच्या शरीरावरील असलेल्या जखमावरुन स्पष्ट होते.
अनुष्काने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे, अशी तक्रार तिच्या पालकांनी केली असून या खुनात सहभागी असलेले जवाहर नवोदय विद्यालयातील प्राचार्य, ड्युटी शिक्षक व त्या संबंधित सर्वांचे सीआयडीमार्फत चौकशी करुन त्यांना नोकरीतून बडतर्फ करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी दलित महासंघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू असून या निवडणुकीच्या व्यापातून थोडा वेळ काढून मुख्यमंत्र्यांनी या चिमुकल्या अनुष्काच्या प्रकरणात लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी, अशी देखील मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शाळेमध्ये भर सकाळी असा प्रकार होत असून हा संशयास्पद असून मृत अनुष्काच्या शरीरावरती अनेक जखम आहेत.
इयत्ता सहावीत शिकणारी अनुष्का ही गळफास घेऊ शकत नाही, तिचा खून झाला आहे .कॉट वरती टॉवेलच्या साह्याने मांडी घालून सकाळी नऊ वाजता संबंधित शिक्षक, शिक्षिका रेक्टर व इतर विद्यार्थिनी तिथे उपस्थित असताना ती कशी काय गळफास घेऊ शकते असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून अनुष्काला न्याय देण्याकरता तिच्या खुण्याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी. जवाहर विद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत.
अनुष्काच्या कुटुंबियांना संरक्षण देऊन त्यांना आर्थिक मदत करावी. सदरचा हा विषय अत्यंत संवेदनशील असून एका गरीब मातंग समाजातील मुलीच्या न्याय हक्काच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालावे अन्यथा दलित महासंघ २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरुन उग्र स्वरुपाचे आंदोलन करेल, असे देखील निवेदनात स्पष्ट केले आहे .
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे ,शहराध्यक्ष संदीप आलाट, तालुका उपाध्यक्ष रमेश शेंडगे, युवक आघाडी अध्यक्ष अमोल कांबळे, तालुका सहअध्यक्ष हरिश्चंद्र कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
















