सोलापूर – राष्ट्रीय युवक दिनानिमित्त समृद्धी कला मंच वतीने उद्योजक युवक सुहास आदमाने व युवती डॉ. ऋचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी जाहीर केले. निवड समिती सदस्य गणेश पवार, संतोष शिरसट व अरविंद मोटे यांनी यांची निवड केली आहे.समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात सहभागी स्पर्धक असल्याने प्रचंड रस्सीखेच करंडक मिळवण्यासाठी होणार आहे.त्यामुळे सोलापुरातील श्रोत्यांना उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे.
येथील समृद्धी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ अंतर्गत समृद्धी कला मंचच्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचा समारोपप्रसंगी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मानपत्र, शाल, फेटा व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच समृद्धी परिवारातील मयुरेश वाघमारे व भक्ती घुले या युवक व युवतीचा तसेच खेळाडूंचाही सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सिद्धेश्वर मंदिराशेजारील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात याचे वितरण रविवारी (दि.11) सायंकाळी सात वाजता होणार आहे. थोर साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन रविवारी केले आहे. ही स्पर्धा सकाळी एक वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून निवडक ४७ स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली आहे. सोलापुरातील श्रोत्यांनी उत्कृष्ट भाषणे ऐकण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आव्हान समृद्धी कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष मल्हारी बनसोडे, सुमित फुलमामडी,किरण लोंढे, यांनी केले आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धाप्रमुख मल्लिनाथ निंबर्गी सहकार्यवाह, हिरालाल धुळम, श्रीमंत कोळी, अर्चना कलखांबकर, डॉ माधुरी भोसले, अमोलिका जाधव विशेष प्रयत्न करीत आहेत.

















