अहिल्यानगर : केंद्र शासनाच्या सडक परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सडक सुरक्षा – जीवन रक्षा ही संकल्पना घेऊन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने एमआयडीसी नागापूर येथील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे १५० विद्यार्थी व शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. रस्ता सुरक्षा चिन्ह असलेले फलक हातात घेऊन यावेळी रॅली काढण्यात आली. उपक्रमात सहभागी झालेल्या सुमारे 400 ते 500 विद्यार्थ्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, रहदारीचे नियम व रस्ता सुरक्षा संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, मन्सूर सय्यद, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी, सनफार्मा विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब सातपुते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















