पंढरपूर – अहिल्यानगर येथे झालेल्या अहिल्यानगर सायक्लोथाँन ( Ahilyanagar cyclothon ) तसेच नाशिक सायकल राईडमध्ये येथील कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी चमकदार कामगिरी केली. संस्थेच्या सचिवांच्या हस्ते यशस्वी मुख्याध्यापक व शिक्षकाचा सन्नान करण्यात आला.
येथील कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांनी अहिल्यानगर सायक्लोथाँन ५० किलोमीटर अंतर सलग दोन तास आठ मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून उल्लेखनीय यश प्राप्त केले व सन्मानचिन्ह मिळविले. त्याचबरोबर प्रशालेचे उत्साही शिक्षक व उत्कृष्ट धावपट्टू महेंद्र वसावे यांनी नाशिक येथे झालेल्या नाशिक हाफ मॅरेथॉन मध्ये २१ किलोमीटर अंतर धावण्याच्या शर्यतीत सलग एक तास ५३ मिनिटात पूर्ण करून सन्मानचिन्ह प्राप्त केल्याबद्दल दोन्हीही विजेत्या गुरूंजनांचा गौरव पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात दोन्हीही गुरुजनांचे यश म्हणजे पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचिलत कवठेकर प्रशालेच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह व अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. यावेळी प्रशालेचे इतरही शिक्षक बंधु आवर्जून उपस्थित होते.
















