राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहराच्या मुख्य प्रवेश द्वार सह विविध 20 रस्ते मार्गावरील ठिकाणी वॉटर फाउंटेन , वॉटर कर्टन, इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्यात येणार असून या ठिकाणांची महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी पाहणी करत आवश्यकता सूचना केल्या आहेत.
राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महापालिकेला प्राप्त झालेल्या एकूण 22 कोटीच्या निधीमधून हवा प्रदूषण कमी करण्यासाठी हरित क्षेत्र वाढविण्याकरिता आर्किटेक्चर असोसिएशनच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार हा कृती आराखडा शहराच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यानुसार शहरातील विविध 20 ठिकाणी या कार्यक्रमांतर्गत धूळ नियंत्रित करण्यासाठी वॉटर फाउंटेन , वॉटर कर्टन, इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियोजित रस्ते ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी आज मंगळवारी दुपारी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सहाय्यक अभियंता तफन डंके, पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर आदी अधिकारी उपस्थित होते.