मंगळवेढा – तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा ३३ वा गळीत हंगाम सांगता समारंभ चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांच्या शुभहस्ते व संचालक राजेंद्र चरणुकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने कारखान्याचे संचालक महादेव सखाराम लुगडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता महादेव लुगडे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. हा समारंभ कारखान्याच्या यशस्वी हंगामाचा अभिमान साजरा करणारा व भविष्यातील नियोजनावर प्रकाश टाकणारा ठरला.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चेअरमन शिवानंद पाटील यांनी साखर कारखानदारीतील स्पर्धात्मक वातावरणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “साखर कारखानदारीचे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी यापुढील काळात कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करणे काळाची गरज आहे. यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा ठोस विचार सुरू केला आहे.” कारखान्याची जुनी मशिनरी, तालुक्यातील कारखान्यांची वाढती संख्या व एकरी सरासरी ऊस टनेज कमी झाल्याने यंदा उद्दिष्टाप्रमाणे गाळप करता आले नाही, असेही त्यांनी सांगितले. तरीही व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक मंडळ, सभासद शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी झाला. पाटील यांनी कारखान्याच्या संस्थापकांचे योगदान आठवण करून दिले. संस्थापक चेअरमन स्व. मारवाडी वकीलसाहेब, संस्थापक व्हा. चेअरमन स्व. रतनचंद शहा शेठजी व माजी चेअरमन स्व. चरणुकाका पाटील यांनी हा कारखाना शेतकऱ्यांचे ‘मंदिर’ म्हणून नावारूपाला आणला. त्यांच्या विचारांचे पालन घडविताना संचालक मंडळाने डिसेंबर २०२५ अखेर ₹२८५० प्रति मेट्रिक टन ऊसबिल दिले. तोडणी-वाहतूक बिले १५ जानेवारी २०२६ पर्यंत अदा केली. कारखान्याने ३ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून ३००५६४ क्विंटल साखर उत्पादन केले. गेल्या तीन वर्षांत एफ.आर.पी. पेक्षा जास्त ऊसदर वेळेवर दिले, तर कामगारांचे पगार प्रत्येक महिन्याच्या दहाव्या तारखेपूर्वी अदा केले. सभासद शेतकऱ्यांचा विश्वासच हंगाम यशस्वी करण्याचे मुख्य कारण आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक राजेंद्र चरणुकाका पाटील बोलताना म्हणाले, “कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन असताना मागील हंगामात ३६०० ते ३९०० टन प्रतिदिन गाळप करून उच्चांक गाठला. यंदा मात्र मशिनरीच्या तांत्रिक अडचणी व सुरुवातीच्या जास्त पावसामुळे ऊसाच्या मुळ्या कुजल्या, वाढ खुंटली, त्यामुळे टनेज व साखर उतारा कमी झाला.” भविष्यात मशिनरी सुधारणा करून चांगले गाळप करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी प्रास्ताविक करताना संचालक मंडळाचे नियोजन, शेतकरी, ठेकेदार, मजूर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य हंगाम यशस्वी करण्याचे कारण असल्याचे सांगितले.या हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी-वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ठेकेदार भिवा शिंदे, सुनिल जाधव, प्रशांत ठेंगील; डम्पिंग ठेकेदार वसंत दोलतडे, राजकुमार आसबे, तात्यासाहेब घोडके; बैलगाडी ठेकेदार भाऊसाहेब पठाडे, रमेश पठाडे, अजिनाथ पन्हाळकर; मशिन तोडणी-वाहतूक ठेकेदार सुनिल लुगडे, शिवाजी आवताडे, महादेव लोखंडे यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार, सिझन कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.सदर प्रसंगी व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, दादासाहेब दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, अशोक केदार, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह नामदेव जानकर, सिद्धेश्वर मेटकरी, भिवा शिंदे, महेश लुगडे, आबा ताड, बहुसंख्य सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार संघटना, पतसंस्था पदाधिकारी, ठेकेदार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संचालक रेवणसिद्ध लिगाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.




















