सांगोला – पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, प्रा.डॉ.विधीन कांबळे, प्रा.तानाजी यादव हे तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव येथे पक्षी निरीक्षणास गेले असता त्यांना बार हेडेड गुज म्हणजेच परदेशी राजहंस या दुर्मिळ पक्ष्यांच्या पन्नास हून अधिक मोठ्या थव्याचे दर्शन झाले. हे हिवाळी पाहुणे पक्षी चीन, तिबेट, रशिया व मंगोलिया येथे राहणारे बर्फाळ हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीसाठी भारतामध्ये स्थलांतर करून दाखल होतात. या पक्षाच्या डोक्यावर असणाऱ्या विशिष्ट पट्टेदार रचनेमुळे मराठीमध्ये या पक्ष्याला पट्टकादंब या नावाने ओळखले जाते. हा पक्षी आकाराने अत्यंत मोठे असतात व वजन सहा ते सात किलोग्रॅम असते. ते हिमालयाच्या पर्वतरांगांहून ८ ते ९ हजार मीटर इतक्या उंचीवरून उडून भारतात येतात.
तसेच त्यांचे पंख अत्यंत मजबूत असतात. ते एका दिवसामध्ये १ हजार ६०० किमी इतका मोठ्या अंतराचा प्रवास करू शकतात. नद्या, तलाव, धरणांचा जलाशय हे त्यांचे अधिवास आहेत. ते गवताच्या अंकुर बिया किंवा शेवाळ खाऊन उपजीविका करतात. भारतात आसाम येथील चिल्का सरोवर, राजस्थान येथील भरतपूर पक्षी अभयारण्य, महाराष्ट्रातील भिगवन, मायणी, वीर धरण परिसर या ठिकाणी ते मोठ्या संख्येने स्थलांतर करून दाखल होतात. जलाशय परिसरात मध्यम उंचीवर हवेत उडताना किंवा जलाशयात शिस्तबद्ध पद्धतीने पोहताना किंवा जलाशया जवळील गवतात अंकुर बिया खाताना या देखण्या परदेशी राज हंसाची फोटोग्राफी करण्यासाठी वन्यजीव फोटोग्राफर्स उत्सुक असतात.
सांगोला तालुक्यातून परदेशी राजहंस पक्षाची एवढ्या मोठ्या संख्येने ही प्रथमव नोंद झाली आहे. हे पक्षी मार्च महिन्याच्या अखेरीस त्यांच्या मूळ देशामध्ये जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करतील. हे पक्षी कावेरी, तुंगभद्रा, भीमा या नद्यांच्या काठांवर आढळतात. महाराष्ट्रातील भिगवन, कुंभारगाव तसेच कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी या पक्षांचे छायाचित्रीकरण करण्यासाठी अनेक पक्षी व वन्य जीव छायाचित्रकार गर्दी करतात.
– प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, पक्षी अभ्यासक, सांगोला
























