भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केल्यानंतर आज भाजपात अनेकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येईल, असा दावा केलेला. महाराष्ट्रात 14 तारखेला मोठा राजकीय भूकंप येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. त्यांच्या या दाव्यानुसार आज भाजपात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.
विशेष म्हणजे पश्चिम विदर्भात आज काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वाशिमचे काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार अनंतराव देशमुख, काँग्रेस नेते नकुल देशमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्यासह अनेक इतर पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.