शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमधील संपूर्ण वातावरणच बदललं. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या बाजूला बसलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. फक्त तेच नव्हे, अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्याच्या दिसून आल्या. यावेळी अजित पवार सभागृहात सर्वांना शांत करताना दिसले.
घोषणाबाजीमुळे सभागृहात एकच गोंधळाचं वातावरण होतं. शरद पवार यांच्या समोर कार्यकर्ते भावुक झाले होते. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी एक एक करून राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आपल्या भावना मांडल्या. जयंत पाटील, अनिल देखमुख, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, फौजिया खान, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांच्या तीव्र झालेल्या भावना पाहता समिती ठरवेल ते पवार साहेबांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. पण कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. साहेबांनी कुणालाच सूचना किंवा विश्वासात घेतलेलं नाही. यामुळे साहेबांच्या निर्णयाने तुम्ही तसेच आम्ही स्तब्ध झालोय. तुम्ही भावुक झाले. तशाच आमच्या भावना आहेत, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. साहेबांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंतीही पटेल यांनी केली.