सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर काल १६ जून रोजी रिलीज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट टीजर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
त्यानंतर मध्यंतरी ट्रेलर पाहून परिस्थिती जरा सुधारली आणि लोकांमध्ये पुन्हा आदिपुरुषची क्रेझ निर्माण झाली. पण चित्रपट प्रदर्शित होताच पुन्हा एकदा प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.
कालपासून या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार, हनुमानाचा संवाद सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे.
सोशल मीडियावर तर अक्षरशः लोकांनी पुराणेचे संदर्भ देऊन निर्मात्यांचे कान टोचले आहेत. अशातच एक मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
ज्या ‘रामायण’ मालिकेची अवघ्या जगभरात दखल घेतली गेली, ज्या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं त्या स्वामी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्री रामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनी आता ‘आदिपुरुष’ वर निशाणा साधला आहे.
‘आदिपुरुष’ पाहिल्या नंतर एक व्हिडिओ शेयर करत अत्यंत तीव्र शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच काही मोलाचे सल्ले देऊन निर्मात्याचे कानही टोचले. यांना धर्माची मोडतोड करण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल यांनी केला आहे.
या व्हिडिओ मध्ये अरुण गोविल म्हणाले आहेत की, ‘कुणी आपल्या घराचा पाया हलवतं का? कुणी आपलं मूळ सोडतं का?.. मग आपल्या धार्मिक परंपरा, संस्कृती यालाही कोणतंही नवीन स्वरूप देण्याची गरज नाही.’
‘माझं हेच कर्तव्य आहे की, आताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला मी हेच शिकवेन, हेच दाखवेन जे सत्य आहे, शाश्वत आहे आणि सनातन आहे. यांना कुणी अधिकार दिला, आपल्या धार्मिक आस्था आणि भावनांची मोडतोड करण्याचा , त्याला धक्का लावण्याचा..’
‘काही चित्रपट निर्माते, लेखक, कलाकार, चित्रकार, जाहिरातदार यांना भान बाळगणे गरजेचे आहे, कारण क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली ते धर्माची थट्टा आणि परंपरांचे विडंबन करून जगापुढे दाखवत आहेत.’ अशी जहरी टीका अरुण गोविल यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटावर केली आहे.