डॅशिंग, दबंग, सिंघम अशा उपाधी मिळवून राज्यात प्रसिद्ध झालेले मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांनी शासनाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? त्या रोखण्या्साठी काय उपाय योनजा करायला हव्यात या संदर्भात एक सर्वे नुकताच त्यांनी मराठवाड्यात केला होता.
तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर त्यांना पेरणीपुर्वी प्रत्येक हंगामा दहा हजार रुपयांची मदत करावी, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली होती. यामुळे राज्यभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू असतांना अचानक त्यांनी स्वेच्छा निवृती का घेतली? याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता.
९ फेब्रुवारी २०१९ मध्ये ते विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले होते. साधारण शरीरयष्टी, उंची आणि राहणीमान असलेल्या केंद्रेकरांनी जिथे जिथे अधिकारी म्हणून काम केले तिथे तिथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामामुळे जेव्हा राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आली, तेव्हा बीडमध्ये त्यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला होता.
विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर त्यांनी मराठवाड्यात काम केले. त्यानंतर कृषी आयुक्त म्हणून त्यांची पुण्याला बदली करण्यात आली होती. त्यानंतर क्रीडा विभागात आणि दोन वर्षांनी ते मराठवाडा विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले होते.
दरम्यान, केंद्रेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज शासनाने मंजुर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला असून केंद्रेकर यांना मार्च २०२४ पर्यंत स्वेच्छा निवृत्ती देवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारित मराठवाड्यात अनेक विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या निवृतीमुळे त्यावर परिणाम होवू शकतो, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. यावर आज दुपारी सुनावणी होणार आहे.