वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत, आणि आपण म्हणतो आहे 21 व्या शतकात आहे. आपण प्रगती करतो आहोत, ही प्रगती आहे का? जर प्रगती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराने जावे लागेल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. छत्रपती शाहू महाराजांच्या 273 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांचे शिल्प देऊन उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला. उदयनराजे म्हणाले की, थोर पुरुष होते म्हणून आपण लोकशाहीत वावरतो आहे. ते नसते, तर आपण गुलामगिरीत असतो. परंतु, त्यांची बदनामी केली जाते त्याचे वाईट वाटते. थोर पुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विकृतीत वाढ झाली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर होत चाललेला आहे. स्वार्थापोटी तेढ निर्माण केली जात आहे.
ते पुढे म्हणाले, घराणेशाहीमुळे विकेंद्रीकरण लांबच राहिले, फक्त भाषणात विकेंद्रीकरण असतं. बाकी सगळीकडे केंद्रीकरण आहे. जर हे केंद्रीकरण असेच सुरू राहिलं, तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराज नसते, तर लोकशाहीचे तुकडे व्हायला किती वेळ लागला असते. सर्वधर्मसमभावाची राज्यकर्त्यांनी व्याख्या बदलून टाकली, हे घातक आहे. जेव्हा तुकडे होतील तेव्हा प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल. जशी देशाची वाताहत होईल तशी आपल्या कुटुंबाची देखील वाताहत होणार असल्याचे उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, सर्वधर्मसमभाव संकल्पनेचा विसर पडला असल्याने समाजात तेढ निर्माण होत आहे. आपण इस्लामिक देश पाहिले, तर तिथं राजेशाही आहे. शिवाजी महाराजांना वाटलं असते राजेशाही ठेवावी, तर आज आपल्याकडे राजेशाही असते. परंतु, शिवाजी महाराजांना वाटलं की लोकांचा सहभाग हवा आहे.
शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा विचार जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवला पाहिजे. ही आताची गरज आहे. थोर पुरुषांचे विचार फक्त एका दिवशी न घेता कायम घेतले पाहिजेत. देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे. त्यांचा विचार हणून पाडू, आज जगात सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. त्यांचा विचार घेऊन अनेक चळवळी उभा राहिल्या. देशाची प्रगती म्हणजे काय? प्रत्येकाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. राज्याची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची ‘काशी’ होईल.