धाराशिव-
रस्त्याच्या कडेला फळे विक्री करून उदरनिर्वाह करणार्या विधवा महिलेच्या मुलीवर उपचारासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे. मुंबई येथील रूग्णालयात तिच्यावर उपचार केल्यानंतर ती बरी झाली आहे. मुलीला जीवदान दिल्याबद्दल मुलीची आई आशा राजेश सोनवणे यांनी आरोग्यमंत्री सावंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.
धाराशिव येथील आशा राजेश सोनवणे ह्या फळे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची 17 वर्षाची मुलगी अनुष्का ही दुर्धर आजाराने त्रस्त होती. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असताना आशा सोनवणे यांनी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार केले, परंतु मुलगी आजारातून बरी होऊ शकली नाही. तेव्हा काहीजणांनी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.सावंत यांना भेटून मदत मागण्याबाबत सुचविले होते. त्यानंतर सोनवणे ह्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भारतीताई गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख साळुंके यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन मुलीवर आतापर्यंत झालेल्या उपचाराची कागदपत्रे एकत्र करून घेण्याबाबत डॉक्टरांना कळविले. त्यानंतर गरजू महिलेची आरोग्यमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्याशी भेट घडवून आणली.
महिलेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्यमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी तत्काळ मुंबईच्या शिवडी येथील रूग्णालयाला पत्र देऊन मुलीच्या उपचार करण्याबाबत तसेच त्यांच्याकडू कोणतीही रक्कम घेऊ नये अशा सूचना दिल्या. त्यानुसार श्रीमती सोनवणे यांनी मुलीला रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मुलीवर उपचार केल्यानंतर ती बरी झाली आहे. मोफत उपचार मिळाल्यामुळे श्रीमती सोनवणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.सावंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.