पावस येथील गौतमी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या संरक्षक भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. गौतमी नदीवर पावसाळा संपल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण करता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला.
जूनअखेरपर्यंत बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले. त्यातील एका बाजूचे काम पूर्णत्वास गेले असून दुसऱ्या बाजूचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण केल्यानंतर या संरक्षण भिंतीमुळे साठवण क्षेत्राला संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर त्याचा आजूबाजूच्या भागांमध्ये त्रास होणार नाही.