वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे आपला निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील, तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे.
‘द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या ‘प्ले बुक’मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली – हे आणि असे बरेच काही निवडले जाईल आणि भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल’, असा आरोपही आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त करताना केला आहे. या ट्विटच्या शेवटी त्यांनी भाजप-आरएसएसची योजना भारतीय प्रजासत्ताकला निवडणुकीतल्या फायद्यासाठी ‘भयभीत प्रजासत्ताक’मध्ये रूपांतरीत करण्याची आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.