कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. यामध्ये पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे.
कोरोना काळात मुंबई महापालिकेने दिलेली कंत्राट आणि अन्य संबंधित गोष्टींमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) म्हणणे आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यामुळे पेडणेकर यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉडी बॅग खरेदीत घोटाळ्याचा आरोप
मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग दोन हजार रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटले आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे हे कंत्राट तत्कालीन महापौर पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान ईडीने २१ जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपये रोकड, १५० कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय १५ कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. तसेच या छाप्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह १० ते १५ जणांचा समावेश होता.
बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने तपास सुरू केला होता. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असे ईडी चौकशीतून समोर आले होते.