चालू वर्षी खरीप हंगामाकरिता शासनामार्फत फक्त एक रुपया भरून पिक विमा योजना सुरु आली होती. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी पिक घेणाऱ्या ९७,१७४ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक होता. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु.१/- वजा जाता शेतकरी हिश्श्याची उर्वरित फरकाची रक्कम सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान म्हणून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. तसेच योजनेत सहभाग होण्यासाठी बँक, सामायिक सुविधा केंद्र, शासनाचे संकेतस्थळ इ.पर्याय उपलब्ध होते. जिल्ह्यात पिक विमा योजनेची कृषि विभागामार्फत पिक विमा कंपनीच्या सहकार्याने विविध माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली होती .
ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी पिक घेणाऱ्या ९७,१७४ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी बँक मार्फत ३५,८७५, सामायिक सुविधा केंद्रामार्फत ५८,१४१, शासनाच्या संकेतस्थळामार्फत ३१५८ इतक्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. पिक विमा योजनेत गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी शेतकऱ्यांनी २१९ % एवढा भरघोस प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी दिली