जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत परीक्षा घेण्याची तयारी झाली आहे. येत्या २३ ऑगस्टपासून घटक चाचणी सुरू होणार आहे. यातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. अनुत्तीर्ण झाल्यास फेरपरीक्षा देता येईल. मात्र, त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात बसावे लागणार आहे. पूर्वीचा ढकलपासचा पांगुळगाडा आता काढून टाकण्यात आला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली गेली. विद्यार्थ्यांना अभ्यास करूनच उत्तीर्ण व्हावे लागेल. फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात वर्षभर अध्ययन करावे लागेल. पुन्हा परीक्षा देत उत्तीर्ण होऊनच पुढच्या वर्गात जावे लागेल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवले तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही. वर्षातून एकूण चार परीक्षा असतील. यात दोन घटक चाचण्या, एक सत्र आणि एक वार्षिक परीक्षा असणार आहे. वार्षिक परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास फेरपरीक्षा होईल.