आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. तर पक्षाचे दुसरे खासदार संजय सिंह यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेतील 5 खासदारांचा असा दावा आहे की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता.
हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला होता. भाजपचे 3 खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा (बीजेडी), नरहरी अमीन (भाजप), सुधांशू त्रिवेदी (भाजप), फांगनॉन कोन्याक (भाजप ) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे. थंबीदुराई हे एआयडीएमकेचे खासदार आहेत. दरम्यान निलंबनानंतर खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे.