समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पवित्र लक्षात घेऊन येथे 28 ऑगस्टला सिन्नर तहसील कार्यालयात रस्ते विकास महामंडळ आणि शेतकरी यांची बैठक होणार आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी करताना प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासने दिली. प्रत्यक्षात महामार्ग पूर्ण होऊनही त्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसून, समृद्धी लगत राहत असलेल्या शेतकऱ्यांना या महामार्गामुळे अडचणींमध्ये भर पडली आहे.
समृद्धी लगतच्या ग्रामीण रस्त्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वहिवाटीचे रस्ते तयार करून न देणे आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग जवळपास रस्ता रोको केला होता. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगली धावपळ झाली.प्रशासनाने यात मध्यस्थी करीत २८ ऑगस्टला सिन्नर तहसील कार्यालयात समृद्धीबाधित शेतकरी आणि रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.