तृतीयपंथीयांना समाजात कायम अवहेलना सोसावी लागते. त्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबतही फारसे प्रयत्न केले जात नाहीत. हे चित्र सगळीकडे दिसते. या सर्व गोष्टींना छेद देत ससून सर्वोपचार रुग्णालयाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे.
ससून रुग्णालयातील नवीन ११ मजली इमारतीत हा वॉर्ड आहे. या वॉर्डमध्ये २४ बेड असून, दोन अतिरिक्त आयसीयू बेड आहेत. तृतीयपंथीयांवर उपचार करण्यास अनेक रुग्णालये नकार देतात. मात्र त्यांना ससूनमध्ये अतिशय सहजपणे उपचार मिळणार आहेत. या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना संवेदनशीलपणे वागण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचाराची नवी दिशा ससूनमुळे खुली झाली आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे.